माणगाव : प्रतिनिधी राम भोस्तेकर
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माणगाव तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. माणगाव नगरपंचायतीचे पाणीपुरवठा, शिक्षण व सामाजिक न्याय सभापती तथा नगरसेवक अजित तार्लेकर यांच्या संकल्पनेतून हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये माणगाव शहरातील इयत्ता पाचवी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या एकूण १० विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये भास्करदादा कामेरकर विद्यालय, लीड स्कूल, एस. एस. निकम स्कूल, श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूल तसेच आदर्श प्राथमिक विद्यामंदिर अर्थात जंगम शाळा, माणगाव येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांपैकी ओम राकेश जाधव, आर्या प्रतीक भोसले, भाविका चंद्रकांत अंबूर्ले, स्वरूप रोहिदास पवार व अर्चित स्वप्निल विद्वांस यांचा सन्मान नगरसेवक अजित तार्लेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी ॲड. मयुरा तार्लेकर यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन केला.
दरम्यान, आदर्श प्राथमिक विद्यामंदिर अर्थात जंगम शाळेची विद्यार्थिनी ईश्वरी अमोल कदम हिने ८९.३३ टक्के गुण मिळवत रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच विघ्नेश बालाजी बनसोडे याने तालुक्यात द्वितीय, अथर्व जोतिबा सावंत व युवराज प्रशांत पाटील यांनी तालुक्यात संयुक्तपणे पाचवा, तर अर्चित स्वप्निल विद्वांस याने तालुक्यात बारावा क्रमांक मिळवला. देविका रुपेश जाधव हिनेही शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा नगरसेवक अजित तार्लेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना पदाधिकारी तथा युवासेना शहरप्रमुख अजिंकेश जाधव, शिवसेना उपशहरप्रमुख इब्राहिम करेल, शिवसेना उपशहरप्रमुख अभिजित घोणे, युवासेना शहरप्रमुख अंकित कदम आदी उपस्थित होते.
जंगम शाळेतील सन्मान सोहळ्याचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण जंगम (गुरुजी), मुख्याध्यापक अमोल जंगम तसेच शाळेतील सर्व शिक्षिकांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे माणगाव शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.









