माणगाव तालुक्यातील तालुक्यातील ८ शाळांमध्ये सुमारे १२० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.
प्रतिनिधी माणगाव
माणगाव तालुक्यातील पत्रकार मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा अनोखा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शैक्षणिक वर्ष २०२६-२७ या वर्षात माणगाव तालुक्यातील विविध प्राथमिक शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा जुने माणगाव, सुरव तर्फे तळे, सुरव तर्फे निजामपूर, उमरोली तर्फे खरवली, महादपोली आदिवासीवाडी, निवी आदिवासीवाडी, माकटी आदिवासीवाडी, व उच्च प्राथमिक शाळा दाखणे या शाळेतील सुमारे १२० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यामध्ये तीन विषयांच्या वह्या, पेन, पेन्सिल, रबर, गिरमीट, चित्रकला वही, स्केचिंग पेन, स्कूल बॅग आदी साहित्यांचा समावेश होता.
ह्या कार्यक्रमासाठी पत्रकार मित्र परिवाराचे सदस्य प्रमोद जाधव,परेश, शिंदे, गिरीश गोरेगावकर, वैभव सत्वे, सुनिल दळवी, नचिकेत म्हापसेकर यांनी महत्वाची भूमिका बजावली.ह्या वाटपाचा मुख्य आणि शेवटचा कार्यक्रम रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाखणे या शाळेत संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माणगाव चे सुप्रसिद्ध हृदयविकार, मधुमेह आणि रक्तदाब तज्ञ डॉ अजय मेहता आणि माणगाव च्या गटशिक्षण अधिकारी सुरेखा तांबट हे उपस्थित होते तर त्यांच्यासह उतेखोल बीट चे केंद्रप्रमुख शंकर शिंदे व दाखणे शाळेचे केंद्रप्रमुख उभारे सर व शाळेचे सर्व शिक्षक वृंद, पालकवर्ग, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्यावेळी या कार्यक्रमाला सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी ज्या दानशूर व्यक्तींनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदतीचा हातभार लावला त्या सर्वांचे पत्रकार प्रमोद जाधव यांनी आभार न मानता धन्यवाद व्यक्त केले. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अनोखे हास्य फुलवणारा या वर्षीचा हा शैक्षणिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.









