माणगाव, दि. २४ जुलै (प्रतिनिधी): कृषी विभागाच्या वतीने मौजे कोशिंबळे तर्फे तळे येथे शुक्रवारी (दि. २४) यांत्रिकीकरण पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात आधुनिक शेती तंत्रज्ञानासोबतच जैविक शेतीचा प्रचार व प्रसार करण्यावर विशेष भर देण्यात आला.
कार्यक्रमात यांत्रिक पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक, गादीवाफ्यावर मॅट नर्सरी तयार करण्याची प्रक्रिया, पिकांच्या संरक्षणासाठी बांधावर तूर लागवडीसाठी बियाणे वाटप तसेच ‘गोकृपामृतम’ या जैविक खताची निर्मिती कशी करावी याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना दाखविण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे व चौधरी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच तालुका कृषी अधिकारी श्री. किरण पडवळकर, तंत्र अधिकारी श्री. रविशंकर कावळे, पंचायत समिती सदस्या श्रीमती संगीता बक्कम तसेच कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे यांनी सांगितले की, भात शेतीतील मजुरांची टंचाई आणि वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता यांत्रिकीकरण हा प्रभावी पर्याय आहे. यांत्रिक पद्धतीने भात लागवड केल्यास वेळ, मजुरी आणि खर्चाची बचत होते. तसेच जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करून ‘गोकृपामृतम’सारख्या जैविक खतांचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
तालुका कृषी अधिकारी श्री. किरण पडवळकर यांनी भाताच्या बांधावर तूर लागवडीचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. शिवाय तुरीमुळे जमिनीत नत्र स्थिरीकरण होऊन जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते.
पंचायत समिती सदस्या श्रीमती संगीता बक्कम यांनी आधुनिक यांत्रिकीकरणामुळे शेती अधिक सुलभ, किफायतशीर आणि उत्पादक होत असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.
प्रात्यक्षिकातील प्रमुख आकर्षणे
- ट्रान्सप्लांटर यंत्राद्वारे यांत्रिक भात लागवडीचे प्रात्यक्षिक.
- गादीवाफ्यावर मॅट नर्सरी तयार करण्याचे मार्गदर्शन.
- बांधावर लागवडीसाठी तूर बियाण्यांचे मोफत वाटप.
- ‘गोकृपामृतम’ जैविक खत तयार करण्याचे प्रत्यक्ष सादरीकरण.
या उपक्रमाचा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून, आधुनिक तंत्रज्ञान व जैविक शेतीचा समन्वय साधणाऱ्या कृषी विभागाच्या या उपक्रमाचे स्थानिक शेतकरी आणि नागरिकांकडून विशेष स्वागत व कौतुक करण्यात आले.










