कर्जत – प्रतिनिधी
कर्जत-कोंदिवडे रस्त्याची दुरवस्था आणि रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांची वस्तुस्थिती शाळेत जाणाऱ्या मुलींनी आपल्या अनोख्या पद्धतीने मांडल्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थिनींनी तयार केलेल्या व्हिडीओची आमदार महेंद्र थोरवे यांनी तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत रस्त्यावरील खड्डे त्वरित भरण्याचे आदेश दिले. त्यानंतर PWD विभागाकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले आहेत.
कर्जत-कोंदिवडे रस्त्याने दररोज शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. रस्त्यात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत होत होती. याच पार्श्वभूमीवर शाळकरी मुलींनी रस्त्याची वस्तुस्थिती आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून मांडली. ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?’ असा सवाल करत एका छत्रीला माईक बनवून मुलींनी प्रशासनाच्या कारभाराची टिंगल उडवत नागरिकांच्या व्यथा मांडल्या. या व्हिडीओची परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली.
विद्यार्थिनींचा हा व्हिडीओ आमदार महेंद्र थोरवे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित PWD अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. नागरिक आणि विद्यार्थ्यांना रस्त्यामुळे त्रास होत असताना कामात दिरंगाई का केली जात आहे, असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. यापूर्वीही अधिकाऱ्यांच्या ढिल्या कारभारामुळे नागरिकांचा रोष लोकप्रतिनिधींना सहन करावा लागत असल्याची खंत आमदारांनी व्यक्त केली होती. काही अधिकाऱ्यांना त्यांनी कठोर शब्दांत सुनावले होते.
दरम्यान, पावसाळ्यापूर्वीच आमदार महेंद्र थोरवे यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली होती. पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि आवश्यक कामे प्रलंबित राहू नयेत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या होत्या. मात्र, पावसाळा सुरू झाल्यानंतरही काही ठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम अपूर्ण राहिल्याने नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत होत्या.
शाळकरी मुलींनी थेट आपल्या व्यथा मांडल्यानंतर या प्रश्नाला अधिक वाचा फुटली आणि आमदारांनी त्याची तातडीने दखल घेतली. अखेर PWD विभागाने कर्जत-कोंदिवडे रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत.
याचबरोबर, भविष्यात या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडू नयेत यासाठी कर्जत-कोंदिवडे रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येईल, असे आश्वासनही आमदार महेंद्र थोरवे यांनी विद्यार्थिनींना दिले आहे. त्यामुळे शाळकरी मुलींच्या एका व्हिडीओमुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.












