माणगाव प्रतिनिधी
“शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायची असेल, तर शाळांची इमारत भक्कम आणि वातावरण आनंददायी असायला हवे,” याच भावनेतून पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने आपल्या ‘सीएसआर’ (CSR) निधीतून सुरू केलेल्या व्यापक शाळा दुरुस्ती अभियानाचा यशस्वी टप्पा गाठला आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा आणि विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने CSR अंतर्गत आत्तापर्यंत माणगाव तालुक्यातील तब्बल २३ शाळांचे नूतनीकरण केले आहे. कंपनीच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
नुकत्याच झालेल्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसात आणि वादळात खचलेल्या, तसेच दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या विविध शाळांच्या नूतनीकृत इमारतींचे लोकार्पण करण्यात आले.
पावसाळ्यात छतातून होणारी गळती, भिंतींचे उखडलेले प्लास्टर आणि नादुरुस्त स्वच्छतागृहे यांमुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणेही कठीण झाले होते. या दुरवस्थेचा मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत होता. ही बाब लक्षात घेऊन पोस्को महाराष्ट्र स्टीलने तत्परतेने या शाळांच्या संपूर्ण दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि अल्पावधीतच शाळांचा चेहरामोहरा बदलून टाकला.
असा घडला शाळांचा कायापालट:
१. रा. जि. प. शाळा चांदे आदिवासीवाडी (उद्घाटन: ३० जुलै): इमारत दुरुस्ती, संपूर्ण रंगरंगोटी आणि मुला-मुलींच्या स्वच्छतागृहांचे अद्ययावतीकरण करून विद्यार्थ्यांना स्वच्छ वातावरण दिले.
२. रा. जि. प. शाळा कडापे (उद्घाटन: ३१ जुलै): छप्पराची संपूर्ण दुरुस्ती करून आकर्षक रंगसंगतीने शाळेला नवे रूप दिले.
३. सुशीलाताई पवार विद्यालय, भाले (उद्घाटन: ३१ जुलै): जुलैतील मुसळधार पाऊस व वादळामुळे या शाळेचे छप्पर उडून गेले होते आणि वर्गखोल्यांतील साहित्याची दाणादाण उडाली होती. पोस्कोने त्वरित पुढाकार घेत संपूर्ण छप्पर दुरुस्ती, नवीन वीज जोडणी (इलेक्ट्रिफिकेशन) व रंगकाम करून शाळा पूर्ववत उभी केली.
४. रा. जि. प. शाळा खरबाची आदिवासीवाडी (उद्घाटन: ११ ऑगस्ट): इमारत दुरुस्ती, बाह्य रंगरंगोटी आणि सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले.
या शाळांव्यतिरिक्त इतर ३ शाळांचीही कामे पूर्ण झाली असून, यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आता सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळाले आहे.
“अडचणीच्या काळात पोस्को कंपनीने मदतीचा हात दिल्यामुळे आमच्या मुलांचे शिक्षण थांबले नाही,” अशा भावना या प्रसंगी पालक व शिक्षकांनी व्यक्त केल्या.
पोस्को कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये आणि त्यांना शिकण्याची गोडी निर्माण व्हावी, हा आमचा मुख्य उद्देश आहे. मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पोस्को परिवार कायम पाठीशी राहील.”
या सर्व कार्यक्रमांना पोस्को कंपनीचे अधिकारी, केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.











