सामूहिक महाराष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात
राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांची प्रभातफेरी
म्हसळा – श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यात भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापनदिन विविध राष्ट्रीय, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यंदा प्रथमच शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी सामूहिक महाराष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले होते.
म्हसळा शहरासह तालुक्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच सामाजिक संस्थांच्या वतीने ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तालुक्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ राजीप कन्या शाळेच्या प्रांगणात तहसीलदार सचिन खाडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी म्हसळा तालुका पोलीस ठाण्याचे स.पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने ध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी पंचायत समितीमध्ये सभापती बबन मनवे, म्हसळा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष सुनील शेडगे,न्यू इंग्लिश स्कूलमध्ये चेअरमन समीर बनकर,केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयात अध्यक्ष संजय खांबेटे,राजीप प्राथमिक मराठी शाळा क्रमांक १ मध्ये पालक समितीचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बाबू शिर्के,जिजामाता शिक्षण संस्थेत अध्यक्ष महादेव पाटील,व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये अध्यक्ष डॉ. मुव्हीज शेख,शाहीन के.जी.अध्यक्ष मुब्बशिर जमादार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मुख्य शासकीय कार्यक्रमात महाराष्ट्रगीतासह राष्ट्रगीत, ध्वजगीत तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सामूहिक देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. अंगणवाडीपासून तहसीलदार कार्यालयापर्यंत वर्षभरात उत्कृष्ट सेवा व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त बालविद्यार्थ्यांनी राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेत सहभागी होत प्रभातफेरी काढली. यावेळी विविध देशभक्तीपर घोषणा देत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि स्वातंत्र्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी मनोगत, देशभक्तीपर गीते आणि विविध राष्ट्रीय कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. संपन्न सामूहिक शासकीय कार्यक्रमात पंचायत समिती, नगरपंचायत, न्यू इंग्लिश स्कूल, अंजुमन हायस्कूल, आयडीएल इंग्लिश स्कूल, वसंतराव नाईक कॉलेज, व्हिजन इंग्लिश स्कूल, राजीप प्राथमिक मराठी व उर्दू शाळा, केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय आदी संस्था व शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संततधार पाऊस पडत असताना देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दुमदुमले यात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विविध राष्ट्रीय उपक्रमांमुळे म्हसळा तालुक्यातील स्वातंत्र्यदिनाचा सोहळा अविस्मरणीय ठरला.









