विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन
पंचायत समितीत विकासकामांचा आढावा बैठक
म्हसळा – श्रीकांत बिरवाडकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे सोमवार दि.१७ ऑगस्ट २०२६ रोजी म्हसळा तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन तसेच तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेण्यात येणार आहे.
खासदार सुनील तटकरे यांच्या दौऱ्याची माहिती म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर बनकर यांनी दिली आहे. दौऱ्याची सुरुवात दुपारी १ वाजता म्हसळा हिंदू स्मशानभूमी येथे हायमास्ट दिव्यांच्या उद्घाटनाने होणार आहे. त्यानंतर राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक, म्हसळा येथे हायमास्ट दिव्याचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. म्हसळा शहर बेलदारवाडी येथे सामाजिक सभागृहाचे उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी १.३० वाजता पंचायत समिती सभागृहात तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत तालुक्यातील विविध विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे तसेच आवश्यक असलेल्या नवीन विकासकामांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
खासदार सुनील तटकरे यांच्या म्हसळा दौऱ्यामुळे तालुक्यातील विकासकामांना आणखी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून या दौऱ्याकडे तालुक्यातील नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.









