म्हसळा तालुक्यात सात संगणक लॅबचे उद्घाटन
म्हसळा – श्रीकांत बिरवाडकर
आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे असून स्पर्धात्मक युगात आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. संगणकाचे ज्ञान ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत स्पर्धेच्या युगात टिकून राहिले पाहिजे असे प्रतिपादन म्हसळा पंचायत समितीचे सभापती बबन मनवे यांनी केले.
पीएमश्री प्राथमिक शाळा म्हसळा नं.१ येथे मंजूर झालेल्या संगणक दालनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हास्तर खनिकर्म योजनेअंतर्गत ५६ आणि जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत ५६ अशा एकूण ११२ इंग्रजी लॅब रायगड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी म्हसळा तालुक्यात सात शाळांना संगणक लॅबचा लाभ मिळाला आहे. यामध्ये पाभरे मराठी,संदेरी उर्दू, पीएमश्री मराठी शाळा म्हसळा नं.१, मेंदडी कोंड, तुरुंबाडी, साळविंडे आणि खारगावखुर्द या शाळांचा समावेश आहे. या संगणक लॅबचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पाभरे मराठी शाळेतील संगणक लॅबचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य अनिल बसवत, संदेरी उर्दू शाळेतील लॅबचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे तर पी.एम.श्री. मराठी शाळा नं.१ येथील लॅबचे उद्घाटन पंचायत समिती सभापती बबन मनवे यांच्या हस्ते करण्यात आले. मेंदडी आणि तुरुंबाडी येथील लॅबचे उद्घाटन उपसभापती लहुशेठ म्हात्रे व पंचायत समिती सदस्या समृद्धी चाचले यांच्या हस्ते तर खारगाव खुर्द येथील संगणक लॅबचे उद्घाटन पंचायत समिती सदस्या प्रियंका निंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती देताना पंचायत समितीचे उपसभापती लहुशेठ म्हात्रे यांनी सांगितले की खासदार सुनील तटकरे,मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांचे म्हसळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकडे सातत्याने लक्ष आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ मतदारसंघाला मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या संगणक लॅबचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
संगणक लॅबच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळणार असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणि भविष्यातील स्पर्धात्मक क्षमतेला निश्चितच चालना मिळणार आहे.









