ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने इंग्रजी शिकण्याची संधी; माजी विद्यार्थिनींनी दिली जेवणाच्या ताटांची भेट
प्रतिनिधी -माणगाव
रिमझिम बरसणाऱ्या श्रावणधारा, ढोलांचा निनाद आणि हाती अभिमानाने फडकणारा तिरंगा अशा देशभक्तीपूर्ण वातावरणात उणेगाव शाळेत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी काढलेल्या शिस्तबद्ध प्रभातफेरीमुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला आणि उत्साही वातावरणात राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शाळेत ‘एज्युस्पार्क इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘रायगड जिल्हा परिषद’ यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘इंग्लिश लॅब’चे लोकार्पण करण्यात आले. पंचायत समिती सदस्या स्वातीताई अरुण करकरे यांच्या हस्ते फित कापून या लॅबचे उद्घाटन झाले.
हेडफोन, संगणक आणि डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा अधिक सहज व प्रभावीपणे शिकण्याची संधी या लॅबमुळे उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळाही आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे यानिमित्ताने दिसून आले. शाळेतील सुविधा आणि शैक्षणिक वातावरण पाहून स्वातीताई करकरे यांनी शिक्षकवृंद, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला सरपंच शुभांगीताई शिर्के, केंद्रप्रमुख कुमार खामकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वासुदेव सत्वे आणि ३६०° प्रोडक्शनचे मालक संतोष शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सरपंच शुभांगीताई शिर्के यांनी शाळेला उपयुक्त बागकामाचे साहित्य भेट दिले, तर शिवाजी सत्वे यांनी विद्यार्थ्यांना पेनचे वाटप केले. स्वातीताई करकरे, गावातील दानशूर व्यक्ती आणि ‘संकल्प मित्र मंडळ’ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले.
या राष्ट्रीय उत्सवाला आणखी भावस्पर्शी किनार लाभली ती शाळेच्या माजी विद्यार्थिनींच्या सामाजिक बांधिलकीमुळे. आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे ऋण व्यक्त करण्याच्या भावनेतून माजी विद्यार्थिनी श्रद्धा रघुनाथ जाधव आणि तनया बाळाराम सत्वे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना जेवणाची ताटे भेट दिली. माजी विद्यार्थिनींकडून मिळालेल्या या प्रेमळ भेटीने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकास समिती, माजी विद्यार्थी संघ, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ आणि पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. स्वातंत्र्यदिनाचा हा सोहळा केवळ राष्ट्रीय उत्सवापुरता मर्यादित न राहता ग्रामीण शिक्षणाला आधुनिकतेची जोड देणारा आणि शाळेप्रती सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करणारा अविस्मरणीय क्षण ठरला.









