माणगाव – प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत कांचनगंगा शिक्षण संस्था संचालित आदर्श प्राथमिक विद्यामंदिर उतेखोल माणगाव येथील विद्यार्थिनी कु. ईश्वरी अमोल कदम हिने नेत्रदीपक यश संपादन केले. सन २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ईश्वरीने शहरी विभागातून रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला.
ईश्वरीच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत पंचायत समिती माणगाव यांच्या वतीने तिचा विशेष गुणगौरव करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सभापती विलास शिंदे मनिषा मालोरे, पंचायत समिती सदस्य अलका केकाणे, संगिता बक्कम, स्वाती करकरे, ज्ञानदेव पदरत, रविंद्र महादेव टेंबे, अक्षय कृष्णा जाधव, सहाय्यक प्रशासन अधिकारी स्नेहल मोरे, सहायक गटविकास अधिकारी मानसी रहाटे, गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट, उतेखोल केंद्राचे केंद्रप्रमुख शंकर शिंदे, मुख्याध्यापक तसेच पंचायत समिती माणगावमधील विविध शासकीय कार्यालयांचे विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
ईश्वरीच्या यशामागे तिचे मार्गदर्शक शिक्षक, पालक आणि शाळेतील शिक्षकवृंद यांचे मोलाचे योगदान आहे. आदर्श प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक अमोल जंगम तिच्या मार्गदर्शिका सविता निंबाळकर मॅडम तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंदांचे या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून ईश्वरीने आपल्या शाळेसह माणगाव तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून आणि नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.









