म्हसळा शहरातील खड्डे बुजविण्याचा उपक्रम पावसाने वाहून गेला
कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज
म्हसळा प्रतिनिधी – श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा शहरातील बाजारपेठ परिसरातील म्हसळा – श्रीवर्धन राज्य मार्गावर काही मोक्याच्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्याने संबंधित प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत म्हसळा नगरपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन सिमेंट व खडीच्या मिश्रणाने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता.मात्र हा दिलासा फार काळ टिकला नाही.
खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर काही वेळातच पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांमध्ये टाकण्यात आलेले सिमेंट-खडीचे मिश्रण वाहून गेले आणि पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे दिसू लागले. त्यामुळे “सर आली धावून आणि खड्डे गेले वाहून”अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रशासनाने केलेल्या तात्पुरत्या उपाययोजनेवर पावसाने पाणी फेरल्याने ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’ अशी गत झाली आहे. केवळ खड्डे बुजविण्याऐवजी त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करून रस्त्याची योग्य डागडुजी व मजबुतीकरण करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
विशेषतः बाजारपेठेतील वर्दळीच्या ठिकाणी वाहनांची मोठी ये-जा असते. त्यामुळे खड्डे पुन्हा निर्माण होण्यापूर्वी संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून पावसात टिकणारी कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.









