एसीबीच्या कारवाईनंतर आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह; ‘तालुका आरोग्य ऑडिट’ची नागरिकांची मागणी
श्रीवर्धन प्रतिनिधी सोपान निंबरे :
रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक घनश्याम बेलाजी कोमटवार (वय ५२) यांना कथित बोगस डॉक्टरवर कारवाई न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्यानंतर श्रीवर्धन तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका व्यक्तीवर कारवाई टाळण्यासाठी लाचेचा व्यवहार समोर आला असला, तरी या घटनेने आता “श्रीवर्धन तालुक्यात प्रत्यक्षात किती अधिकृत डॉक्टर आहेत?” हा अत्यंत गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
एसीबीच्या माहितीनुसार, २२ वर्षीय तक्रारदाराने Community Medical Service & Essential Drugs तसेच Emergency Medical Technician (Basic) हे अभ्यासक्रम पूर्ण करून श्रीवर्धन तालुक्यात क्लिनिक सुरू केले होते. त्याला बोगस डॉक्टर ठरवून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत कारवाई करण्याची धमकी देत कारवाई टाळण्यासाठी सुरुवातीला १० हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याची तक्रार झाली. त्यानंतर तडजोड होऊन पाच हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने आरोग्य सहाय्यक घनश्याम कोमटवार यांना पकडले.
या कारवाईमुळे केवळ एका कर्मचाऱ्याच्या कथित लाचखोरीचा प्रकार समोर आलेला नाही, तर तालुक्यातील वैद्यकीय सेवा, डॉक्टरांची पात्रता आणि त्यावर आरोग्य विभागाचे नियंत्रण याबाबत अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण झाले आहेत.
तालुक्यात किती डॉक्टर अधिकृत?
श्रीवर्धन तालुक्यात विविध गावांमध्ये खासगी दवाखाने, क्लिनिक आणि वैद्यकीय सेवा सुरू आहेत. मात्र यापैकी किती व्यक्ती कायदेशीररीत्या वैद्यकीय व्यवसाय करण्यास पात्र आहेत? किती जणांकडे मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी आहे? किती जणांची संबंधित वैद्यकीय परिषदेकडे वैध नोंदणी आहे? याची अधिकृत आकडेवारी आरोग्य विभागाकडे आहे का?
असल्यास ती जनतेसमोर का जाहीर केली जात नाही? आणि नसल्यास इतक्या वर्षांपासून तालुक्यात सुरू असलेल्या वैद्यकीय व्यवसायावर नेमके कोणाचे नियंत्रण आहे? असे सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असेल तर जबाबदार कोण?
एखाद्या व्यक्तीची वैद्यकीय पात्रता नसताना ती रुग्णांवर उपचार करीत असेल, तर चुकीचे निदान, चुकीची औषधे, इंजेक्शन अथवा उपचारपद्धती यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा केवळ कागदपत्रांचा किंवा प्रशासकीय तपासणीचा विषय नाही; हा थेट नागरिकांच्या आरोग्य आणि जीविताशी संबंधित प्रश्न आहे.
एकीकडे बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यावरच लाच स्वीकारल्याचा आरोप होतो आणि दुसरीकडे तालुक्यात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पात्रता व नोंदणी तपासली जाते का, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. त्यामुळे प्रशासनाने आता या संपूर्ण व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
‘तालुका आरोग्य ऑडिट’ करा
एसीबीच्या कारवाईनंतर श्रीवर्धन तालुक्यातील सर्व खासगी क्लिनिक व वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तींची शैक्षणिक पात्रता, वैद्यकीय परिषद नोंदणी, क्लिनिकची कायदेशीर स्थिती आणि आवश्यक परवानग्या यांची विशेष तपासणी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तसेच मागील काही वर्षांत बोगस डॉक्टरांविरोधात किती तक्रारी प्राप्त झाल्या? किती जणांवर कारवाई झाली? किती प्रकरणे प्रलंबित आहेत? कारवाईसाठी कोणत्या अधिकाऱ्याने कोणती पावले उचलली? याचाही लेखाजोखा आरोग्य विभागाने जनतेसमोर मांडावा, अशी मागणी होत आहे.
प्रशासनाच्या डोळ्यात आता झणझणीत अंजन कधी?
“तालुक्यात अधिकृत डॉक्टर किती आणि अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणारे किती?” या एका प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आता आरोग्य विभागाने जनतेला देण्याची वेळ आली आहे.
एसीबीच्या कारवाईनंतर केवळ एका कर्मचाऱ्यावर कारवाई करून हा विषय संपविणे पुरेसे ठरणार नाही. या घटनेच्या निमित्ताने संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यातील वैद्यकीय व्यवस्थेची वस्तुस्थिती तपासणे गरजेचे आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये, पात्र डॉक्टरांच्या नावाखाली अपात्र व्यक्ती उपचार करीत नसाव्यात आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या निष्पाप रुग्णाला जीव गमवावा लागू नये, यासाठी श्रीवर्धन तालुक्याचे पारदर्शक ‘आरोग्य ऑडिट’ कधी होणार?
आता प्रशासनाने कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष मैदानात उतरून तपासणी करण्याची गरज आहे. या एसीबी कारवाईने प्रशासनाच्या डोळ्यांत अंजन घातले आहे; आता ते डोळे उघडून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेकडे पाहणार का, याकडे श्रीवर्धनवासीयांचे लक्ष लागले आहे.










