श्रीवर्धन प्रतिनिधी : सोपान निंबरे
श्रीवर्धन तालुक्यात आज एक अत्यंत गंभीर आणि भविष्यासाठी धोकादायक चित्र दिसत आहे. गेल्या काही वर्षांत अनेक गावांमध्ये ५० ते ६० टक्के शेतीजमिनी विकल्या गेल्याची चर्चा सर्वत्र आहे. काही ठिकाणी शेती ओस पडत आहे, तर काही गावांचे मूळ स्वरूपच बदलू लागले आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली, तर येत्या काही वर्षांत स्थानिक माणूस स्वतःच्या जन्मगावीच अल्पसंख्याक होण्याची भीती नाकारता येणार नाही.
जमीन ही केवळ मालमत्ता नसते. ती आपल्या पूर्वजांनी जपलेला वारसा, आपल्या संस्कृतीचा पाया आणि पुढील पिढीच्या जगण्याचा आधार असते. आज आर्थिक अडचणीत किंवा इतर कारणांमुळे विकलेली जमीन उद्या कितीही पैसा मोजला तरी परत मिळत नाही. पैशाचा उपयोग काही काळापुरता होतो; पण जमीन कायमची हातातून निघून जाते.
यापेक्षा मोठा प्रश्न असा आहे की, शेतकरी जमीन का विकतो? कारण त्याच्याकडे पर्याय उरलेला नाही. तालुक्यात अनेक वर्षांपासून धरणे, तलाव, बंधारे, सिंचन योजना आणि जलसंधारणाची अनेक कामे प्रलंबित आहेत. पाण्याअभावी शेती तोट्यात जाते, उत्पादन घटते आणि शेवटी हतबल झालेला शेतकरी जमीन विकण्याचा निर्णय घेतो. त्यामुळे केवळ शेतकऱ्याला दोष देऊन चालणार नाही; शासनानेही आपल्या जबाबदारीचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.
आज गरज आहे ती संपूर्ण श्रीवर्धन तालुका एकत्र येण्याची. गावागावातील नागरिक, शेतकरी, तरुण, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्था यांनी एकमुखाने शासनाकडे मागणी केली पाहिजे की, तालुक्यातील सर्व प्रलंबित धरणे, तलाव, बंधारे आणि सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यात यावेत. पाणी मिळाले तर शेती टिकेल; शेती टिकली तर गाव टिकेल; आणि गाव टिकले तरच आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित राहील.
त्याचबरोबर शेतकऱ्यांना दर्जेदार वीजपुरवठा, हमीभाव, प्रति एकर अनुदान, सिंचनासाठी पुरेसे पाणी आणि सर्व शासकीय योजनांचा पारदर्शक लाभ मिळाला, तर जमीन विकण्याची वेळ अनेकांवर येणार नाही.
आज आपण गप्प बसलो, तर उद्या आपल्या लेकरांना स्वतःच्या गावात रोजगारासाठी दुसऱ्यांच्या दारात उभे राहावे लागू शकते. ही वेळ येऊ नये, यासाठी आजच जागे होण्याची गरज आहे.
जमीन वाचली तरच शेती वाचेल… शेती वाचली तरच गाव वाचेल… गाव वाचले तरच पुढील पिढीचा स्वाभिमान आणि अस्तित्व टिकेल.
आता प्रश्न फक्त जमिनीचा नाही; तर प्रत्येक गावासह श्रीवर्धन तालुक्याच्या भविष्याचा आहे. आज आवाज उठवूया, अन्यथा उद्या पश्चात्तापाशिवाय काहीही उरणार नाही.








